
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जर्मन वायर चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीचे जर्मन वायर आणि गुन्ह्यात वापरलेले मालवाहू वाहन असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पीव्हीआर चौक ते औसा बायपास मार्गावर सापळा रचला. त्यावेळी MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची तपासणी केली असता, वाहनात चोरीचे सुमारे १५० किलो वजनाचे जर्मन वायरचे चार बंडल आढळून आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरी करून ते स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली दिली. त्यानंतर औसा पोलीस ठाण्यात पडताळणी केली असता, या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४१४/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (रा. लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून ५५ हजार रुपये किमतीचे चोरीचे जर्मन वायर आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचे टाटा ACE XL मालवाहू वाहन असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis