
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभर २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी पार्वती मंगल कार्यालय, लातूर येथे विशेष महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा 'एक खिडकी प्रणाली' द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये सातबारा व फेरफार दुरुस्ती, डिजिटल सातबारा, विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, फार्मर आयडी, अधिकार अभिलेखात महिलांचे नाव समाविष्ट करणे, पात्र निवासी अतिक्रमण नियमितीकरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, शिधापत्रिका वितरण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन शिबिरात मोफत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, महिलांचे आरोग्य, हाडांचे आजार, कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन, रक्त तपासणी तसेच आवश्यक आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हरितोत्सव अंतर्गत विविध फळझाडे व उपयुक्त वृक्षांची रोपे नागरिकांना वितरित करण्यात येणार आहेत. तसेच महिला व बालविकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनांची माहिती आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) सवलत व प्रवासी कल्याण योजनांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरात विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे लातूर शहर मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis