
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानासाठी अर्ज केलेल्या नऊ आदिवासी मत्स्य शेतकऱ्यांना गव्हाण, तालुका जळकोट येथे दि.२४ जुलै रोजी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शन कार्यक्रमात मत्स्य महाविद्यालय, उदगीर येथील प्रा.डॉ.सोमनाथ आर.यादव, डॉ.जयश्री मठपती व डॉ.सागर सातकर यांनी आधुनिक मत्स्यपालनातील विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अमोल मुसणे, मत्स्य विकास अधिकारी, लातूर यांनी शासनाच्या विविध मत्स्यविकास योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मार्गदर्शनादरम्यान तलावातील बायोफ्लॉक मत्स्यपालन, मत्स्यबीजाची निवड, तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन, संतुलित खाद्य व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना, उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तांत्रिक उपाय सुचविण्यात आले.
यावेळी ग्राहक संरक्षण परिषद शासन नामनिर्देशित अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, गणपती वजीरे, गणेश कोडरूळ, पत्रकार संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था समिती महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे उपस्थित होते. बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी त्यांनी मत्स्य शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच मत्स्यपालन व्यवसायातून अधिक उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले.
या क्षेत्रीय मार्गदर्शन उपक्रमामुळे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत लाभार्थी मत्स्य शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि वैज्ञानिक मत्स्यपालनाची दिशा मिळाली असून त्यांच्या मत्स्यपालन व्यवसायाच्या विकासास निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis