
नागपूर, 24 जुलै (हि.स.) : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावातील रहिवाशांसाठी राखीव असलेल्या खुल्या जागेवर ‘नमो उद्यान’ उभारण्याच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली आहे. न्यायालयाने ढाणकी नगरपरिषद, राज्य शासन आणि संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावत सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
निवृत्त शिक्षक गोपालसिंह दत्तासिंह गौर आणि अन्य चौघांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
याचिकेनुसार, ढाणकी येथील साई-श्रद्धानगर परिसराचा विकास करताना विकासकाने रहिवाशांच्या वापरासाठी खुली जागा राखीव ठेवली होती. या जागेचा वापर मुलांचे खेळाचे मैदान, विवाह समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम तसेच परिसरातील दोन मंदिरांशी संबंधित विविध उपक्रमांसाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे.
राज्य शासनाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर रहिवाशांच्या हरकती न मागविता याच खुल्या जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय ढाणकी नगरपरिषदने घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली. जूनमध्ये जागेवर मोजमाप सुरू झाल्यानंतर रहिवाशांनी नगरपरिषदेकडे हरकत नोंदवत प्रकल्प अन्य सार्वजनिक जागेवर हलविण्याची मागणी केली. मात्र, नगरपरिषदने ही मागणी फेटाळून लावल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने मागणी नाकारल्यानंतर रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही सविस्तर निवेदन सादर केले. १४ जुलै रोजी हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी एका संबंधित व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प पूर्ण केला जाईल तसेच विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, रहिवाशांचा ‘नमो उद्यान’ उभारण्यास विरोध नसून ते रहिवाशांसाठी राखीव खुल्या जागेऐवजी अन्य सार्वजनिक जागेवर विकसित करण्यात यावे, अशी त्यांची भूमिका असल्याचे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. वैभव पत्रे आणि ॲड. अनिकेत चव्हाण यांनी न्यायालयात बाजू मांडली. प्रकरणी उच्च न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावत सहा आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी