
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार केला असून, आरोग्य व स्वच्छता विभागांना तातडीने कार्यरत होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये फवारणी, फॉगिंग, डासनिर्मूलन, स्वच्छता मोहीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीत प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचा तसेच नियमित फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, गरज भासल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. रविवारी आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही विशेष फवारणी व फॉगिंग मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शहरातील डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे तातडीने शोधून त्यांचे निर्मूलन करणे, डासांच्या अळ्यांचा नाश करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवून साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, नगरसेवक मिलिंद चिमोटे, ॲड. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भाग्यश्री बोरेकर, डॉ. विशाल काळे, डॉ. अजय जाधव, डॉ. तुषार पोहनकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी