
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : उज्जैन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू व आयुर्वेद संमेलनात चांदूरबाजार येथील दैवज्ञ कैलास कठाळे शास्त्री यांना ज्योतिष क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘हिंद अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात त्यांची नेपाळस्थित साऊथ आशिया अस्ट्रो फेडरेशनच्या सदस्यपदी निवड झाल्याची घोषणाही करण्यात आली.
शारदा ज्योतिष अनुसंधान संस्थानमच्या वतीने उज्जैन येथील पार्क पॅलेस येथे आयोजित या संमेलनात देश-विदेशातील ज्योतिष, वास्तू आणि आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. संमेलनादरम्यान दैवज्ञ कैलास कठाळे शास्त्री यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ज्योतिष तसेच मोबाईलद्वारे होणारे फलकथन व तत्काळ ज्योतिषामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संमेलनात शारदा ज्योतिष अनुसंधान संस्थानमचे संचालक पंडित दिनेश गुरुजी, जी. डी. वासिष्ठ गुरुजी, महर्षी पाणिनी विश्व विद्यालय, उज्जैनचे कुलगुरू शिवशंकर मिश्र तसेच मध्य प्रदेशचे माजी राज्यमंत्री पं. योगेंद्र महंत यांच्या हस्ते दैवज्ञ कैलास कठाळे शास्त्री यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैवज्ञ कैलास कठाळे शास्त्री यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी