
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) | आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या शेकडो वारकऱ्यांच्या भक्तिमय उत्साहाने आज नया अकोली रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात पंढरपूर विशेष दुसरी रेल्वेचे प्रस्थान झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा दशक उपक्रमाअंतर्गत आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना जेवणाचे डबे, उपयोगी किट तसेच आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यावतीने रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.स्थानकावर सकाळपासूनच वारकरी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विठ्ठलभक्तांच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रवासाच्या सुरुवातीलाच टाळ-मृदंग, विठ्ठल भजने आणि ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम यांच्या जयघोषात वारकऱ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करून त्यांची सेवा केली. या आपुलकीच्या आदरातिथ्यामुळे वारकरी भाविक भारावून गेले.
यावेळी ज्येष्ठ वारकऱ्यांचा आ. प्रवीण पोटे पाटील, आ. राजेश वानखडे, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी , श्रीचंद तेजवानी आणि तुषार भारतीय यांच्या हस्ते शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी वारकऱ्यांना सुखरूप प्रवास व विठ्ठलाच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आ. प्रवीण पोटे पाटील, आ. राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह भाजप महिला मोर्चा, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या वारीला सेवाभावाची जोड मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी