मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मालेगाव, 24 जुलै (हिं.स.): मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुरू असलेल्या कथित अनियमितता, बेकायदेशीर प्रकार आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मालेगाव शहर
Investigate irregularities in


मालेगाव, 24 जुलै (हिं.स.): मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुरू असलेल्या कथित अनियमितता, बेकायदेशीर प्रकार आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मालेगाव शहराध्यक्ष देवा खंडू पाटील यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात शहरातील काही सोनोग्राफी केंद्रांमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे भ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांना चालना मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित सर्व केंद्रांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांकडून बेकायदेशीररीत्या दवाखाने व रुग्णालये चालवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही मोठ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय पात्रता नसलेले आरएमओ (RMO) व इतर कर्मचारी अतिदक्षता विभागात (ICU) कार्यरत असल्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिले आकारून नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील पॅथॉलॉजी प्रयोगशाळांमध्ये तपासण्यांचे दरपत्रक प्रदर्शित नसल्यामुळे मनमानी शुल्क आकारले जात असल्याचे सांगत सर्व प्रयोगशाळांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सर्व्हर डाउन किंवा अप्रूव्हल मिळालेले नाही अशी कारणे सांगून मोठी रक्कम तात्पुरत्या स्वरूपात वसूल केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मेडिक्लेमधारक रुग्णांवर विमा दाव्याची रक्कम वाढविण्यासाठी अनावश्यक तपासण्या व उपचार केल्याच्या तक्रारींचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोस्को (POCSO) प्रकरणांतील पीडित मुली व महिलांना शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नमूद करत, या प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णालयांतील मेडिकल स्टोअरमध्ये औषधांवर सवलत न देता पूर्ण एमआरपी आकारली जात असल्याबाबत नियमांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केवळ मान्यताप्राप्त व नोंदणीकृत डॉक्टरांच्या रुग्णालयांनाच औषधे, शस्त्रक्रिया साहित्य व इतर वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करण्यात यावा आणि बोगस डॉक्टर किंवा अनधिकृत दवाखान्यांना वैद्यकीय सामग्री पुरवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक पारदर्शक, कायदेशीर आणि जनहिताभिमुख करण्यासाठी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देवा खंडू पाटील यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande