
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) लातूर पथकाने अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात एका कारवाईत मोठी धडक मारली आहे. बी.ए. तृतीय वर्षाच्या हिंदी विषयाचा सुधारित गुणपत्रिका देण्यासाठी ४,५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकास एसीबीच्या पथकाने लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार २१ वर्षीय तरुण (रा. तळेगाव, ता. अहमदपूर) यांनी एप्रिल २०२६ मध्ये महात्मा गांधी महाविद्यालयातून बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये ते हिंदी विषयाच्या पेपरमध्ये नापास झाले होते. हा पेपर फेर तपासणीसाठी त्यांनी ३६० रुपये फी भरली होती. फेर तपासणीनंतर निकाल लागल्यावर, १७ जुलै २०२६ रोजी कनिष्ठ लिपिक गणेश भगवानराव सांडवे (वय ४५ वर्षे, वर्ग-३, रा. नागोबा नगर, अहमदपूर) यांनी तक्रारदाराला फोन करून मी तुला पास केले आहे, असे सांगत पास झाल्याचा मार्क मेमो देण्यासाठी ६,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने २१ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), लातूर कार्यालयात तक्रार दिली. एसीबीने पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती ४,५०० रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी कनिष्ठ लिपिक गणेश सांडवे याने तक्रारदाराकडून ४,५०० रुपयांची लाच स्वतः स्वीकारली. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.
आरोपी गणेश सांडवे याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अहमदपूर येथे कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत वारे करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२३८२-२५३८११ (मोबाईल ९२२६२०१०६४) वर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis