
नाशिक, 24 जुलै (हिं.स.) - - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षान्त समारंभ मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल जिष्णु देव वर्मा उपस्थित राहणार आहेत. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत तसेच नागपूरचे आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, दीक्षात समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची नोंद घ्यावी.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या आंतरवासियता पूर्ण केलेल्या एकूण 12,246 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात एकूण 99 गुणवंत विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभात पदवी व पदव्युत्तर विद्याशाखेचे 8547 विद्यार्थी, एम.फिल चे 06 व वीस विद्यार्थ्यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. सदानंद प्रभाकर सरदेशमुख यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डी.लिट् ही विद्यापीठाची मानद पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागतांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी