अमरावती - आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ; निवड यादीत एकाच विद्यार्थ्यांची दुबार नावे
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता समोर आल्या आहेत. शिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवड यादी क्रमांक ४ आणि ५ मध्य
आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ; निवड यादीत एकाच विद्यार्थ्यांची दुबार नावे!


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता समोर आल्या आहेत. शिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवड यादी क्रमांक ४ आणि ५ मध्ये अनेक विद्यार्थ्यांची नावे समान स्वरूपात समाविष्ट करण्यात आली आहेत. सलग दोन याद्यांमध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव पुन्हा-पुन्हा आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची तत्काळ आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी हजारो गरीब व गरजू विद्यार्थी अर्ज करत असतात. मात्र, कोणत्याही कायदेशीर किंवा प्रक्रियात्मक आधाराशिवाय एकाच विद्यार्थ्याचा समावेश एकापेक्षा अधिक निवड याद्यांमध्ये करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या तांत्रिक घोळामुळे किंवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे इतर पात्र आणि गुणवंत अर्जदार विद्यार्थ्यांच्या वैध संधीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, त्यांच्या हक्काच्या जागेवर गदा आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत झालेला हा प्रकार तांत्रिक दोष आहे की जाणूनबुजून केलेली फेरफार, असा वाजवी संशय आता पालकांकडून व्यक्त केला जात आहे.

निकष पूर्ण करूनही स्वराज सुपासे प्रवेशापासून वंचित

या संपूर्ण प्रक्रियेतील त्रुटींचे उदाहरण म्हणून स्वराज सुपासे या विद्यार्थ्याचा अर्ज समोर आणण्यात आला आहे. स्वराजच्या अर्जामध्ये विहित केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्ण पूर्तता करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे वैध असतानाही त्याची निवड यादीत वर्णी लागलेली नाही. सर्व निकष पूर्ण करूनही या विद्यार्थ्याची निवड का झाली नाही, यामागील कारणांचा शोध घेणे गरजेचे असून, प्रस्तावित चौकशीत या अर्जाचा सखोल विचार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande