
सोलापूर, 24 जुलै (हिं.स.)। मंगळवेढा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे, अन्यथा ‘बोंबाबोंब’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (कामगार पक्ष) पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय मरळी यांना निवेदनाद्वारे दिला.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या परवानगीशिवाय पारंपरिक वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. नागरिकांचा या प्रक्रियेला विरोध असतानाही जबरदस्तीने मीटर बसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही ग्राहकांच्या वीजबिलात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याच्या तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. भविष्यात हे मीटर प्रीपेड पद्धतीचे करून रिचार्जची सक्ती केली जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सामान्य ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही आणि ग्राहकांच्या संमतीला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले होते, असा उल्लेख करत प्रत्यक्षात मात्र त्याविरुद्ध कारवाई होत असल्याचा आरोप केला.याशिवाय शेतकऱ्यांसाठी दिवसा किमान आठ तास वीजपुरवठा करावा, तसेच रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून शेतकऱ्यांना विश्रांतीची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच लवंगी गावातील एजी (AG) लाईनवरील रात्री ६ ते १० या वेळेत बंद असलेला सिंगल फेज वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र सावंत, जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सोमुत्ते, तालुका प्रसिद्धीप्रमुख तानाजी इंगळे, तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे, दिगंबर गरंडे, चिदानंद हुवाळे, तालुका संघटक नितीन पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकनकी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड