
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। प्रकल्प बाधीत शेतकरी व स्थानिकांना उभारल्या जाणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगारासाठी प्राधान्य देणे हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कौशल्य विकास केंद्र तयार करून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे, त्यासाठी टोयोटा किर्लोस्कर यांच्याशी सामंजस्य करार करावा, असे सुस्पष्ट निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली. बैठकीत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. खा. संदीपान भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. विलास भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर यांच्यासह अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
ऑरिक सिटी औद्योगिक वसाहतीत समाविष्ट शेंद्रा व बिडकीन क्षेत्रातील शेतकरी प्रकल्पबाधीत झाले आहेत. त्यांना देण्यात येणारा मोबदला व अन्य प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार मानण्यात आले. त्यांचे उर्वरित प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतले जातील,असे सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
सामंत म्हणाले की, शेंद्रा आणि बिडकीन येथील औद्योगिक वसाहती मध्ये प्रत्येकी २ एकर क्षेत्र पोलीस स्टेशन साठी राखीव ठेवावे. या क्षेत्रात स्थानिक राहिवासी, प्रकल्प बाधित शेतकरी यांची मुले-मुली यांना उद्योगामधील रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, हेच शासनाचे धोरण आहे. उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचे स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र तयार करणे आवश्यक आहे. याठिकाणी टोयोटा-किर्लोस्कर च्या सहभागाने तयार होत असलेल्या कौशल्य विकास केंद्रात डी. एम. आय. डी. सी. चा सहभाग असावा. त्यासाठी त्यांच्याशी सामंजस्य करार करा. त्याद्वारे स्थानिकांना प्रशिक्षित करून रोजगार संधी देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश सामंत यांनी दिले.
प्रकल्प बाधीत क्षेत्रातील भूमिहीन, अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी मजुरी मोबदल्याचा प्रश्नही सानुग्रह अनुदान देऊन तात्काळ निकाली काढावा, शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत क्रीडा संकुल ही डी. एम. आय. सी. ने तयार करावे, असे निर्देश सामंत यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis