
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। ऑरिक हॉल, शेंद्रा डीएमआयसी येथे आज महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बिडकीन डीएमआयसी प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बिडकीन डीएमआयसीसाठी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून स्वतंत्र अप्रोच रोड विकसित करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थानिक युवक-युवतींना उद्योगांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र (Skill Development Centre) स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकांसाठी आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी १५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित ७५० दिवसांच्या मजुरीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी, स्थानिक युवक आणि परिसराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
बिडकीन डीएमआयसी हा मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून, उद्योगवाढीसोबतच स्थानिकांना रोजगार, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाचा लाभ मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब यांनी यावेळी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis