दिल्लीतील आंदोलक अभिजित दीपके यांच्या सुरक्षेसाठी बीडमधील बहीण चिंतेत
बीड, 24 जुलै (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले तरुण नेते अभिजित दीपके यांच्या सुरक्षेची चिंता त्यांच्या बीड येथील बहिणीला सतावत आहे. दिल्लीत पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज, अश
दिल्लीतील आंदोलक अभिजित दीपके यांच्या सुरक्षेसाठी बीडमधील बहीण चिंतेत


बीड, 24 जुलै (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले तरुण नेते अभिजित दीपके यांच्या सुरक्षेची चिंता त्यांच्या बीड येथील बहिणीला सतावत आहे. दिल्लीत पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, भावाशी संपर्क होत नसल्याने त्यांची बहीण स्नेहा जितीन वंजारे यांची मोठी घालमेल होत आहे.

मूळचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके हे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. शिरूर तालुक्यातील खालापूर येथे सासर असलेल्या त्यांच्या भगिनी स्नेहा वंजारे यांनी सांगितले की, भाऊ देशासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत असल्याचा अभिमान आहे. मात्र, आंदोलनातील सद्यस्थिती अत्यंत बिकट असल्याने एक बहीण म्हणून त्याच्या सुरक्षेची व आरोग्याची सतत काळजी वाटते. कुटुंबाचे फोन गेल्यावर अभिजित आणि घरातील मंडळी भावूक होत असल्याने, त्याने स्वतःहून कुटुंबाशी जास्त वेळ संवाद साधणे टाळले आहे.

अभिजित दीपके यांचे वडील भगवान दीपके हे बीड एमआयडीसीत मुख्य उपअभियंता म्हणून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सर्व कुटुंब एकत्र आले होते, त्यानंतर अभिजित परदेशात गेले होते. आता या सामाजिक संघर्षात कुटुंबाचा अभिजित यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांचे भावोजी डॉ. जितीन वंजारे हे खालापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनीही सद्यस्थितीत शिक्षण व्यवस्थेला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पेपरफुटीने तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, यासाठी पुढाकार घेणाऱ्या आपल्या मेहुण्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande