
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)।
ग्रामीण रुग्णालय, सोयगाव, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मा. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिबिर संपन्न झाले.
शिबिरामध्ये मेडिसिन, जनरल सर्जरी, कर्करोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, दंतरोग, बालरोग आदी विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले. गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित तज्ज्ञ रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.
या शिबिराचा एकूण २,००० रुग्णांनी लाभ घेतला, तसेच ६०० चष्म्यांचे आणि ५६८ चालण्याच्या काठ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय ५०० आय ड्रॉप्स, ११२ रक्त तपासण्या आणि ८६ ईसीजी तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालय, सोयगाव, रूबी स्टार रुग्णालय, जामनेर, शासकीय कर्करोग रुग्णालय, मराठवाडा कॅन्सर रुग्णालय, जे. जे. प्लस रुग्णालय, ओरियन सिटिकेअर रुग्णालय, सेंचुरी रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉ. हेडगेवार रुग्णालय, कर्णावत कर्करोग रुग्णालय तसेच संतपुरे रुग्णालय (छत्रपती संभाजीनगर) यांनी सहभाग नोंदवून आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला सोयगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा जनकल्याणकारी उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असून, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर अशा शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis