पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस; खडकवासला धरण भरले
पुणे, 24 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुणे शहरालगतच्या घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जा
Dam


पुणे, 24 जुलै (हिं.स.)।

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुणे शहरालगतच्या घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवस या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वातावरणातील पोषक बदलांमुळे पुणे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सातत्याने पाऊस होत असून, याचा परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पिकांसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी व इतर कृषी कामांना वेग आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचे वातावरण असून, आगामी काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande