



* शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारे आधुनिक 'धान लागवड यंत्र'; तुमान येथे प्रात्यक्षिक यशस्वी !
नागपूर, 24 जुलै (हिं.स.) - दिनांक २४ जुलै २०२६ रोजी कृषी अभियांत्रिकीकरण अभियानांतर्गत मौदा तालुक्यातील तुमान येथे आयोजित धान लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांनी उपस्थित राहून आधुनिक धान लागवड यंत्राचे प्रात्यक्षिक पाहिले तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले की, पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाऊस पडल्यानंतर कमी कालावधीत धान लागवड करावी लागते. मात्र, त्यावेळी मजुरांची कमतरता भासत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होतात. या समस्येवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हे अत्याधुनिक धान लागवड यंत्र उपयुक्त ठरणार आहे.
हे आधुनिक तंत्रज्ञान प्रथमच या भागात प्रात्यक्षिक स्वरूपात पाहण्याची संधी मिळाली. चिखलमय शेतातही ही यंत्रसामग्री अतिशय सहजपणे कार्य करत असून कमी वेळेत, कमी मनुष्यबळात आणि अचूक पद्धतीने धान लागवड करण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे.
याप्रसंगी स्वतः कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या यंत्राच्या माध्यमातून धानाची रोवणी केली. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन होऊन ही यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, वेळ आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून त्याचा थेट फायदा उत्पादनवाढ आणि उत्पन्नवाढीत होईल. प्रत्यक्ष वापरातून या यंत्राचे आणखी फायदे समोर येतील आणि गावागावांतील युवकही या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत होतील.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही राज्यातील महत्त्वाकांक्षी योजना असून, तिची संकल्पना आपण रामटेक मतदारसंघात यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या रामटेक पॅटर्नवर आधारित आहे. पूर्वी चिखलामुळे ज्या शेतात माणसालाही पोहोचणे कठीण होते, त्या ठिकाणी आज शेत पाणंद रस्त्यांमुळे ट्रॅक्टर आणि अन्य कृषी यंत्रसामग्री सहज पोहोचत आहे.
यासोबतच गावागावांत ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा प्रसार करणे आणि कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे यावर शासन भर देत आहे, जेणेकरून शेतकरी अधिक सक्षम आणि समृद्ध होतील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच उपस्थित सर्व शेतकरी बांधव-भगिनींचे आभार मानून त्यांच्या शेतीला अधिक प्रगत आणि फायदेशीर बनविण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांनी दिली.
यावेळी उमेश घाटगे (विभागीय कृषी सह संचालक, नागपूर विभाग), रविंद्र मनोहरे साहेब (जिल्हा अध्यक्ष, कृषी अधिकारी, नागपूर), अर्चना कडू (प्रकल्प संचालक आत्मा, नागपूर), धम्मजीत गजभिये (ग्राम पंचायत तुमान सरपंच),प्रशांत भुरे ( शिवसेना मौदा तालुका अध्यक्ष),विकास चौधरी ( तंटामुक्ती अध्यक्ष ),ग्रिष्मा डेहणे (उपविभागीय कृषी अधिकारी, रामटेक),माणिक पाटील तालुका (कृषी अधिकारी मौदा),सुनील कोरटे (तालुका कृषी अधिकारी रामटेक) शेतकरी
राहुल टाले,प्रसाद इडूपुघंटी,सुरेश कुथे,उमेश गायकवाड,गोपाल येंडापली,प्रल्हाद रंधाई,सुनील पटिये,रामाराव येंडापली,विनायक महादुले,दुर्गेश पटिये,सुधीर भाकरे,राजकुमार भोयर,प्रमोद बरबटे यांच्यासह मोठया संखयेत शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी