
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत, यांच्या वतीने जिल्ह्यात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत संगीत (लोकगीत सामूहिक), एकांकिका/मूकनाट्य (सामूहिक), नृत्य (सामूहिक), चित्रकला स्पर्धा (वैयक्तिक), वक्तृत्व/वादविवाद स्पर्धा (वैयक्तिक), लघुपट/शॉर्ट फिल्म स्पर्धा (वैयक्तिक), घोषवाक्य लेखन स्पर्धा (वैयक्तिक) तसेच स्लॅम पोएट्री/मौखिक कविता स्पर्धा (वैयक्तिक) अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धांचा विषय ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानाशी संबंधित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर आधारित सादरीकरणे अपेक्षित आहेत.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच १५ ते २९ वयोगटातील सर्व युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, परभणी प्रणित सांगवीकर यांनी केले आहे. स्पर्धा मंगळवारी(दि. २८) सकाळी १० वाजता श्री शिवाजी महाविद्यालय, येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, यांच्याशी ९८२३२२२५२९ / ९९७५९५१५१० या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा mybharatparbhani@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis