
यवतमाळ, 24 जुलै (हिं.स.) : मारेगाव तालुक्यात काही तथाकथित राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव आणणे आणि अवैध व्यावसायिकांकडून कथित वसुली केल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकावणे, बदली व निलंबनाच्या इशाऱ्यांद्वारे दबाव निर्माण करणे तसेच अवैध व्यवसायांमध्ये हस्तक्षेप करून तडजोडी घडवून आणल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
या कथित प्रकारांमुळे मारेगावातील पारंपरिक वार्षिक मेळ्यावरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या मनोरंजनासाठी दरवर्षी आयोजित होणारा हा मेळा मागील दोन वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय हस्तक्षेप आणि कथित दादागिरीमुळे मेळा आयोजकांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती पदाचा गैरवापर करून शासकीय यंत्रणेवर दबाव आणत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच काही अवैध व्यावसायिकांकडून प्रशासनाकडे तक्रारी करून नंतर अंतर्गत तडजोडीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
कापूस खरेदी क्षेत्रातही काही व्यक्तींकडून पत्रकारांच्या नावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांकडून पैसे उकळल्याच्या चर्चा सुरू आहेत. या प्रकारांमुळे प्रामाणिक पत्रकारितेच्या प्रतिमेला धक्का बसत असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक रोजगारावर परिणाम
मारेगावातील वार्षिक मेळा हा स्थानिक नागरिकांसाठी मनोरंजनाचे साधन आणि छोट्या व्यावसायिकांसाठी रोजगाराचे माध्यम होता. मात्र, कथित राजकीय हस्तक्षेपामुळे आयोजकांनी गेल्या दोन वर्षांपासून मेळा भरवणे बंद केल्याने स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तालुक्यातील काही प्रामाणिक राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली असून, कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांकडूनही अशा प्रकारांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासन आणि राजकीय नेतृत्व याकडे कसे पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी