नेरळच्या वीजप्रश्नी आ. महेंद्र थोरवे आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
रायगड, 24 जुलै (हिं.स.)। नेरळ शहर व परिसरात सलग तीन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. पाणीपुरवठा, लघुउद्योग, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून महावितरणच्या कारभाराविरोधात
Relief for Neral after three days of darkness; MLA Mahendra Thorve issues a stern warning to Mahavitaran.


रायगड, 24 जुलै (हिं.स.)। नेरळ शहर व परिसरात सलग तीन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. पाणीपुरवठा, लघुउद्योग, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ येथील महावितरण कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

आमदार थोरवे यांनी वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत असल्यास तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तातडीने बिघाड दूर करून नियमित वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, सलग तीन दिवस अंधारात राहिलेल्या नागरिकांनी महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि लघुउद्योगांचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. आमदारांच्या हस्तक्षेपानंतर महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत नेरळ परिसरातील अनेक भागांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. तीन दिवसांच्या अंधारानंतर वीज परतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले. उर्वरित भागांतील वीजपुरवठाही लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande