
बीड, 24 जुलै (हिं.स.)। बीड शहरातील कारंजा रोडवरील अजिजपुरा भागात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने (कॉस्मॅटिक्स) विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल १ लाख १ हजार ९२८ रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुकानदाराविरुद्ध फसवणूक व कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएमसी टॉयलेटरीज कंपनीचे वरिष्ठ तपासणी अधिकारी रईसोदीन फजोदीन इनामदार (वय ५६, रा. वाकड, पुणे) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. गोरी ब्यूटी क्रीम अँड कॉस्मॅटिक्स कंपनीच्या बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारीनुसार, कारंजा रोडवरील 'सबा बुरखा' दुकानाचे मालक रियाज खान जाबाज खान (वय ३१, रा. अजिजपुरा, बीड) हे मूळ कंपनीचा माल असल्याचे भासवून बनावट क्रीम, फेस वॉश आणि साबण विक्री करत असल्याचे आढळले. दुकानाची झडती घेतली असता गोरी ब्यूटी क्रीम, डे अँड नाईट क्रीम, फेस वॉश आणि बायोकोस सिरम असा एकूण १,०१,९२८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सदर कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आरोपी रियाज खान याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तुळजा सपकाळ करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis