
रत्नागिरी, 24 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली (राजापूर) येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर गुरुवारी सायंकाळी मिठाने भरलेला ट्रक उलटला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार GJ-12-BV-6644 क्रमांकाचा ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने मिठाची पोती घेऊन जात होता. महालक्ष्मी मंदिराजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक प्रथम दुभाजकावर चढला आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या मार्गावर उलटला. अपघातामुळे ट्रकमधील मिठाची पोती महामार्गावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र अपघाताच्या वेळी समोरील मार्गावर कोणतेही वाहन नसल्याने संभाव्य भीषण अपघात टळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. ट्रक हटविण्याचे काम आज सकाळी हाती घेण्यात आले. कोदवली परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी