
गडचिरोली, 24 जुलै, (हिं.स.) सिरोंचा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, पेंटीपाका येथील प्रलंबित धान खरेदी तात्काळ सुरू करावी, धान खरेदीस मुदतवाढ द्यावी आणि अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि. २४ जुलै) पेंटीपाका बसस्टँडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे दीड ते दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पेंटीपाका धान खरेदी केंद्रात अनेक शेतकऱ्यांचे धान अद्यापही खरेदी न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.63 वर पेंटींपाका गावाजवळ.ठिय्या देत... घोषणाबाजी करीत धान.खरेदी सुरू करा, शेतकऱ्यांना न्याय द्या,अश्या मागण्या केला.
...या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधींना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शासन स्तरावर धान खरेदीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून अडकलेली वाहने मार्गस्थ केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond