
सोलापूर, 24 जुलै (हिं.स.)। महिला सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १७ हजार नवीन बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे सुमारे पावणेदोन लाख (१.७५ लाख) महिला बचत गटांशी जोडल्या जाणार असून, जिल्ह्यातील बचत गटांची संख्या २५ हजारांवरून ४२ हजारांपर्यंत पोहोचणार आहे.सध्या जिल्ह्यातील २५ हजार बचत गटांमध्ये सुमारे अडीच लाख महिला सहभागी आहेत. किमान दहा महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करू शकतात. गटाची नोंदणी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ३० हजार रुपये, असे एकूण ६० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाते. ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नसून गटाच्या उपक्रमांसाठी वापरता येते.बचत गटाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. गटाची कामगिरी समाधानकारक असल्यास ही कर्जमर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत वाढविली जाऊ शकते.याशिवाय ‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांकडूनही कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सात टक्के, तर तीन लाख रुपयांवरील कर्जावर १२ टक्क्यांपर्यंत व्याजदर लागू राहणार आहे.बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी लघुउद्योग, घरगुती व्यवसाय आणि स्वयंरोजगार सुरू करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. यंदाच्या वाढीव उद्दिष्टानुसार अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी गावागावांत जनजागृती आणि मार्गदर्शन दौरे करत आहेत. जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बचत गट स्थापन करण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून महिलांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांकडून सुमारे ६१५ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड