
सोलापूर, 24 जुलै, (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुढील महिन्यात सुमारे १५० कंत्राटी पदांची भरती करण्यात येणार असून, त्यासाठी नव्या सेवा पुरवठादाराची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागनिहाय कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभाग तसेच विविध ११ संकुलांमध्ये दरवर्षी ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या भरतीमध्ये प्रामुख्याने शिपाई आणि लिपिक पदांचा समावेश असतो.२०२५-२६ या वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादाराचा करार संपुष्टात आल्याने नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
पुढील दहा दिवसांत सेवा पुरवठादाराची निवड होण्याची शक्यता असून, त्यानंतर विविध विभागांच्या गरजेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.शिपाई आणि लिपिक पदांसाठी मिळणारे तुलनेने चांगले मानधन लक्षात घेता पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवारही मोठ्या संख्येने अर्ज करतात. अर्जदारांच्या शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.दरम्यान, यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठातील विविध विभागांमध्ये आवश्यकतेनुसार नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड