
सोलापूर, 24 जुलै, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, वातावरण ढगाळ राहील तसेच थंड वारे वाहण्याचा अंदाज विभागीय कृषी संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. या काळात रात्रीच्या तापमानातही घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ३ लाख ३७ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ४७.६ टक्के इतकीच आहे.
कृषितज्ज्ञांनी सांगितले की, ज्या भागात ८० ते १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला असून जमिनीत पुरेसा ओलावा आहे, त्या ठिकाणी पेरणी पूर्ण करावी. मात्र, कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुढील पावसाची प्रतीक्षा करावी.खरीपातील उडीद, मूग, चवळी आणि तूर या पिकांमध्ये जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पावसाच्या परिस्थितीनुसार पीकपद्धतीत बदल करायचा असल्यास शास्त्रोक्त आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय पिकांवर पाने कुरतडणाऱ्या अळ्या आणि पर्णभक्षी किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास तातडीने नियंत्रण उपाययोजना कराव्यात. चवळी पिकातील पिवळ्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पांढऱ्या माशीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही कृषी संशोधन केंद्राने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड