विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती – महापौर तेजवानी
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मतदारयादीचे विशेष पुनरीक्षण सुरू असून, त्याच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मह
विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती; प्रत्येक नगरसेवकाने शिबिरे आयोजित करून सहकार्य करावे – महापौर श्रीचंद तेजवानी


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मतदारयादीचे विशेष पुनरीक्षण सुरू असून, त्याच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता महानगरपालिका येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीस मा.जिल्हाधिकारी आशिष येरेकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की,भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारयादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून,याअंतर्गत नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी २४ ते २६ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत असून,नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन गणनापत्रक भरून बीएलओकडे जमा करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी सांगितले की,गणनापत्रक भरून न दिल्यास संबंधित मतदाराचे नाव आगामी प्रारूप मतदारयादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी वेळेत गणनापत्रक जमा करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा. २४ ते २६ जुलै या कालावधीत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व विधानसभा मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदारांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मतदान केले होते,त्याच केंद्रावर जाऊन बीएलओकडून गणनापत्रक घेऊन ते भरून त्वरित जमा करावे,असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील सुमारे २५ लाख मतदारांपैकी १६ लाख मतदारांनी गणनापत्रक भरून दिले असून,अद्याप ९ लाख मतदारांनी गणनापत्रक जमा केलेले नाही. एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये,यासाठी सर्वांनी तातडीने या विशेष मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी सुधारित मतदारयादी कार्यक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की,१ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ३० जून ते ८ ऑगस्टदरम्यान बीएलओमार्फत घरोघरी भेटी,८ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना,१७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी,१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती स्वीकारणे,१७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरपर्यंत त्यावरील कार्यवाही आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारयादीतील दुबार नावे वगळणे,मयत व्यक्तींची नावे कमी करणे तसेच नवीन पात्र मतदारांचा समावेश करून अचूक,पारदर्शक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करणे हा या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासून आवश्यक असल्यास १६ सप्टेंबरपर्यंत दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथ लेव्हल एजंट (BLA)नियुक्त करून प्रशासनाला सहकार्य करावे,असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,विशेष पुनरीक्षण (SIR)हे पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे. यापूर्वी २००२ मध्येही अशाच प्रकारचे व्यापक पुनरीक्षण करण्यात आले होते. अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या कामात कार्यरत असून,प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना गणनापत्रक भरण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत जिल्ह्यातील विशेष पुनरीक्षणाचे सुमारे७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघांतील काम अपेक्षेपेक्षा कमी असल्याने या दोन्ही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सांगितले की,मा.भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणारा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)हा लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. अचूक,पारदर्शक आणि अद्ययावत मतदारयादी तयार होणे ही प्रत्येक निवडणुकीची मूलभूत गरज असून,या कार्यात लोकप्रतिनिधी,प्रशासन आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ते म्हणाले की,प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात जनजागृती करून विशेष शिबिरांचे आयोजन करावे. नागरिकांना गणनापत्रक भरून देण्यासाठी प्रोत्साहित करावे,जेणेकरून एकही पात्र मतदार मतदारयादीतून वंचित राहणार नाही. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या जबाबदारीने हे काम करत असून,त्यांना लोकप्रतिनिधींसह सर्व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत समाविष्ट होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष पुनरीक्षण (SIR)अत्यंत महत्त्वाचे असून,या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले.

बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले,उपमहापौर सचिन भेंडे,स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर,सभागृह नेते चेतन गावंडे,विरोधी पक्षनेते विलास इंगोले,गटनेते नाना आमले,डॉ. राजेंद्र तायडे,शेख हमीद शेख वाहेद,सन्मा.नगरसेवक व नगरसेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande