
अमरावती, 24 जुलै (हिं.स.)अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये नागरिकांना ब्लिंकिट, स्विगी ,इन्स्टामार्ट यांसारख्या ऑनलाईन डिलिव्हरी सेवांमार्फत कालबाह्य व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा पुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
या प्रकरणी अमरावती महानगरपालिकेच्या नगरसेविका पद्मजा विजय कोंडण्य यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, नागरिकांना एक्सपायरी झालेल्या वस्तू, सडलेली फळे-भाज्या, खराब झालेली दुग्धजन्य उत्पादने तसेच निकृष्ट दर्जाचे मांस व अंडी यांचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित गोदामांची तपासणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनीही ऑनलाईन मागविलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाची एक्सपायरी तारीख, पॅकेजिंग आणि दर्जा तपासूनच वापर करावा तसेच कालबाह्य अथवा निकृष्ट दर्जाचे उत्पादन आढळल्यास संबंधित कंपनीकडे तक्रार नोंदवून अन्न व औषध प्रशासनालाही माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी