गुरूदेव सेवा मंडळाने मानले राज्य सरकारचे आभार
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक गुरुदेव सेवाश्रमाच्या भाडेपट्टा नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्व
राष्ट्रसंतांच्या आश्रमाचे मुद्रांक शुल्क माफ


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक गुरुदेव सेवाश्रमाच्या भाडेपट्टा नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाचे संस्थेने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

नागपूर येथील सुभाष रोडवरील ५,३४० चौरस फूट जागा तत्कालीन मध्य प्रदेश शासनाने १९५४ मध्ये अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला नाममात्र एक रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून दिली होती. भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी संस्थेचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, त्यावरील मुद्रांक शुल्काची रक्कम संस्थेसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा भार ठरत असल्याने शासनाकडे शुल्क माफीची मागणी करण्यात आली होती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रनिर्माण, ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि सर्वधर्मसमभावाचे कार्य तसेच नागपूर येथील या ऐतिहासिक आश्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल संस्थेने समाधान व्यक्त केले आहे. हा निर्णय राष्ट्रसंतांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या लाखो अनुयायांसाठी आनंददायी आणि अभिमानास्पद असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

या निर्णयाचे स्वागत करत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक मंडळाचे सदस्य तथा चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, सुरेंद्र भुयार, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबा पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू, अॅड. दिलीप कोहळे, डॉ. राजाराम बोथे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि शुभम बोथे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन

नागपूर येथील या ऐतिहासिक जागेचे भूमिपूजन १९५४ मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गुरुदेव सेवाश्रमाची उभारणी करण्यात आली. गुरुकुंज मोझरीच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची ही उपशाखा असून, आज हा आश्रम राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि कार्याचा ऐतिहासिक वारसा जपणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. देशभरातून हजारो भाविक या आश्रमाला भेट देत असतात.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande