
यवतमाळ, 24 जुलै (हिं.स.) वाढते प्रदूषण आणि हवामानातील बदलांचे मोठे आव्हान समोर असताना, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलिस ठाण्याने पर्यावरण संरक्षणासाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्श पाऊल उचलले आहे. मारेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस ठाण्याच्या परिसरात ‘स्वास्तिक पॅटर्न’ या अभिनव पद्धतीचा वापर करून तब्बल ९०० वृक्षांचे नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणारे मारेगाव हे पहिले पोलिस ठाणे ठरले आहे.
हा संपूर्ण उपक्रम पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. या मोहिमेचे नेतृत्व मारेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर दानडे यांनी केले. वृक्ष लागवडीचे वैशिष्ट्य ठरलेल्या ‘स्वास्तिक पॅटर्न’चे शास्त्रोक्त नियोजन व प्रभावी अंमलबजावणी शनमुका नाथन यांनी केली. या अनोख्या पद्धतीमुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासोबतच एक अतिशय आकर्षक आणि सुंदर हरित परिसर निर्माण होणार आहे. या हरित मोहिमेला वन विभागाची मोलाची साथ लाभली. वणीच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संगीता कोकणे आणि मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी भीमराव खेरडे यांच्या उपस्थितीत वन विभागामार्फत विविध प्रजातींची दर्जेदार वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात आली. या दोन्ही अधिकार्!यांनी स्वतः वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रमाचा उत्साह वाढवला.
या मोहिमेत मारेगाव पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी, तसेच पुरुष व महिला पोलिस कर्मचार्!यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. केवळ झाडे लावून न थांबता, ‘प्रत्येकाने लावलेल्या वृक्षाचे दीर्घकालीन संगोपन व संवर्धन करण्याची’ वैयक्तिक जबाबदारी यावेळी सर्व पोलिस अंमलदारांनी स्वीकारली व पर्यावरण रक्षणाचा सामूहिक संकल्प केला. शाश्वत आणि हरित भविष्यासाठी मारेगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची औपचारिकता किंवा मोहीम नसून, भावी पिढीसाठी हिरवागार आणि समृद्ध नैसर्गिक वारसा निर्माण करण्याची आपली सामाजिक जबाबदारी आहे. स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मारेगाव घडविण्यासाठी मारेगाव पोलिस सदैव कटिबद्ध आहेत. परिसरातील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन व संगोपन करावे. - सागर दानडे, पोलिस निरीक्षक, मारेगाव.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी