
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, केळीगव्हाण, ता. बदनापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) यांच्या वतीने गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्त शेतीच्या बांधावर वृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात संपन्न झाले.
कृषी विकासाचे ध्येय, पर्यावरण संवर्धन आणि शेती सुजलाम-सुफलाम करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामध्ये शेतीच्या बांधावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास, जलसंवर्धनास चालना मिळण्यास तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लागतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी आमदार नारायण कुचे यांनी सपत्नीक उपस्थित राहून गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या अमृततुल्य मार्गदर्शनातून अध्यात्म, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि कृषी समृद्धी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्व सेवेकरी, भाविक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उपस्थितांनी गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घेत शेतीच्या बांधावर वृक्षलागवड व संवर्धनाचा संकल्प केला.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर अध्यात्म, पर्यावरण आणि कृषी विकासाचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम प्रेरणादायी व समाजोपयोगी ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis