
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रीसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन (इन्क्युबेशन सेंटर) तर्फे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र आणि उपयोजित परमाणू या पाच प्रमुख शैक्षणिक विभागांसोबत संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योग-अभ्यासक्रम सहकार्य वृध्दिंगत करण्याच्या उद्देशाने 'कोलॅबोरेशन एंगेजमेंट' करार करण्यात आला.
या सहकार्य करारांतर्गत विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना नवोपक्रम, उद्योजकता, स्टार्टअप निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधनाचे व्यापारीकरण, उद्योग संलग्न प्रकल्प, इंटर्नशिप, मार्गदर्शन तसेच इन्क्युबेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अतिक, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. वाय. के. मावळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की, विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि इन्क्युबेशन सेंटर यांच्यातील सहकार्यामुळे संशोधन आधारित स्टार्टअप्स, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख कौशल्य विकास, बौध्दिक संपदा निर्मिती आणि विद्याथ्र्यांमध्ये उद्योजकतेची संस्कृती अधिक बळकट होईल. विद्यापीठातील संशोधन प्रयोगशाळा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि इन्क्युबेशन परिसंस्थेचा प्रभावी समन्वय साधून नाविन्यपूर्ण कल्पनांना यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी