
परभणी, २४ जुलै (हिं.स.) : नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर दगडफेकीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाचा वसमत वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (२४ जुलै) उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जंतरमंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित लाठीचार्जामुळे अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याचे समोर आले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व्यवस्थेला अशा प्रकारच्या घटना शोभणाऱ्या नाहीत, असे वकील संघाने नमूद केले आहे.
तसेच, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखला जावा आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर वसमत वकील संघाचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र साखरे, सचिव ऍड. दिपक मुरुंबेकर, उपाध्यक्ष ऍड. शेख मोहसीन शेख करीमोद्दीन, सहसचिव ऍड. केतनकुमार सारंग, कोषाध्यक्ष ऍड. नाहीद सिद्दीकी, ग्रंथालय सचिव अॅड. विनोद खोते तसेच महिला प्रतिनिधी ऍड. साक्षी सचिन जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis