
- जबाबदार अधिकार्यांवर कारवाईची मागणी
परभणी, 24 जुलै (हिं.स.)।
परभणी शहरातील गेल्या सहा दिवसांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते रितेश झाबंड यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देऊन 29 जुलै रोजी होणार्या सर्वसाधारण सभेत याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. निवेदनात झाबंड यांनी म्हटले आहे की, अन्न, पाणी आणि निवारा या जीवनावश्यक गरजांप्रमाणेच महानगरपालिकेने नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, शहरात पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मुख्य जलवाहिनी (मेन रायजिंग लाईन) फुटल्यामुळे शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याचा आरोप त्यांनी केला. ही जलवाहिनी जुनी झालेली असताना यूआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेत नवीन जलवाहिनीचा समावेश का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच घरांच्या खालून गेलेल्या जुन्या जलवाहिनीऐवजी रस्त्यालगत नवीन जलवाहिनी टाकण्यात का आली नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घ्यावे, तसेच 2022 मध्ये नवीन जलवाहिनीचे काम झाल्यानंतरही वारंवार जलवाहिनी फुटणे आणि गळतीच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची बिले कशी मंजूर झाली, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहराच्या विकासासाठी आतापर्यंत शेकडो निवेदने दिली असून त्यापैकी एकाही निवेदनाला उत्तर मिळाले नसल्याची खंत व्यक्त करत, किमान पाणीप्रश्नावर तरी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही रितेश झाबंड यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis