
रत्नागिरी, 24 जुलै (हिं.स.) । चुकीच्या रॅम्पमुळे दिव्यांगांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यात सुधारणा करण्याबाबतचे निवेदन स्टेट बँकेच्या येथील मुख्य शाखेला आरएचपी फाउंडेशनने सादर केले.
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खारेघाट रोडवरील शाखेतील तसेच एटीएममधील दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेले रॅम्प मानकांनुसार नसल्याने दिव्यांगांसह सर्वसामान्य नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यासंदर्भात शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांना निवेदन देण्यात आले.
फाउंडेशनच्या वतीने रॅम्पची पाहणी करण्यात आली असता मुख्य रॅम्पसमोरच भिंत असल्याने त्याचा वापर करणे अशक्य होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच एटीएममधील रॅम्पदेखील दिव्यांगांसाठी अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ही बाब दिव्यांग व्यक्तींच्या सुलभ व समान प्रवेशाच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचे सांगत तातडीने योग्य दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मागण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावर शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांनी दिव्यांग प्रतिनिधींची बाजू समजून घेत, दिव्यांगांसाठी सुलभ व मानकांनुसार नवीन रॅम्प लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, शकिरा कुरेशी, दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, उपाध्यक्ष किरण धनावडे, चिपळूण दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अशोक भुस्कुटे आणि सदस्य अमृता भुस्कुटे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी