
लातूर, २५ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर लातूर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य साठा जप्त केला. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेला ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पोही जप्त करण्यात आला असून, वाहनासह एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध धंदे तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शुक्रवारी (२५ जुलै) पहाटे सुमारे ४.१० वाजण्याच्या सुमारास लामजना–तुळजापूर टी-पॉईंट मार्गावर सापळा रचून आयशर टेम्पो (क्र. TS 12 UE 4190) अडवला.
वाहनातील दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मोहम्मद शेरू मोहम्मद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी सांगितली. टेम्पोतील मालाबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची पोती तसेच 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
या कारवाईत विविध ब्रँडचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य माल, राजरत्न किमामचे डबे आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य माल कोठून आणण्यात आला, तो कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis