
यवतमाळ, 25 जुलै (हिं.स.)
आषाढी एकादशी...अवघ्या महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचा आणि विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमणारा पवित्र दिवस. आज लाखो वारकर्!यांची पावले पंढरपूरच्या दिशेने धावत आहेत. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात चंद्रभागेच्या तीरावर विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर लोटला आहे. मात्र, ज्यांना पंढरीची वारी साधली नाही, त्यांच्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्!या पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थानातही शनिवारी (ता. २५) तितकाच दिव्य, भक्तिमय आणि अलौकिक सोहळा रंगला आहे. शनिवारी पहाटेपासूनच हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पुसदमध्ये दाखल झाले असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरावटींनी भक्तिरंगात न्हाऊन निघाला आहे. संत चोखामेळा म्हणतात ‘माझ्या जीवींचा जीवनु। पाहतां तनु मनु भुलोनी जाय?’ या अभंगातील प्रत्येक शब्द भक्ताच्या अंतःकरणातील भावविश्व उलगडतो. विठ्ठल हा केवळ देव नसून तो जीवनाचा श्वास आहे, त्याचे दर्शन होताच मनातील सर्व चिंता, अहंकार आणि संसाराचा गोंधळ क्षणात विरघळून जातो. पुसदच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरातील सर्वांगसुंदर, सावळ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मनोहारी मूर्र्तीसमोर उभे राहिल्यावर हाच आत्मानुभव प्रत्येक भाविकाला लाभतो. म्हणूनच वर्षानुवर्षे हजारो भक्तांची पावले या विदर्भाच्या पंढरीकडे आपसूक वळत असतात. भक्तीबरोबरच समाजसेवेची परंपरा जपणारे श्री ज्ञानेश्वर संस्थान यंदाही धार्मिक कार्यक्रमांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी आषाढी एकादशीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण करीत आहे.
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ३ वाजता विठुरायाच्या पंचामृत महापूजेने उत्सवाची सुरवात करण्यात आली. या महापूजेस नगराध्यक्ष मोहिनी नाईक, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम दर्शन बारीतील भाविक तसेच दीपक आसेगावकर व मधुसूदन महाजन परिवार यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात आली . पहाटे ५ वाजता महाआरतीनंतर ५.३० वाजता श्री ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, भजन, हरिभक्तपरायण गणेश महाराज धर्माळे यांच्या श्रीहरी कीर्तनाने झाला . बाहेरगावच्या भाविकांसाठी बसस्थानक ते मंदिर आणि मंदिर ते बसस्थानक अशी मोफत वाहनसेवा आहे. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार असून तब्बल १५०० सेवेकरी भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत.
डॉ. चंद्रकुमार देशमुख (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिर, डॉ. अमोल खांदवे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निकर्म व विविध आयुर्वेद उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय एका रूग्णालयाकडून रक्तदान शिबिर, लायन्स क्लब ऑफ पुसदच्या वतीने देहदान नोंदणी अभियान तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने एसआयआर जनगणनेबाबत मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. रक्तदान किंवा देहदानाचा संकल्प करणार्!यां भाविकांना संस्थानकडून थेट दोन दर्शन पास देण्यात येत आहेत. पुसद पोलिस, नगर परिषद, महसूल विभाग, महावितरण, स्थानिक व्यापारी व नागरिक यांच्या सहकार्याने हा यात्रा महोत्सव साकार होत आहे. ‘पंढरीला जाता आले नाही तरी हरकत नाही; विदर्भाच्या पंढरीत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भक्तिभावाचा अविस्मरणीय अनुभव घ्यावा, ’ असे भावपूर्ण आवाहन श्री ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष बिपीन चिद्दरवार यांनी केले आहे. आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्यात भक्ती, सेवा, संस्कार आणि समाजकारणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी