अमरावती - शाळांतील शैक्षणिक कार्य गंभीरपणे बाधित जिल्हा मुख्याध्यापक संघाची जिल्हा कचेरीवर धडक
अमरावती, 25 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनःरीक्षण कार्यात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळांमधील ७० ते ८० टक्के शिक्षकांची बीएलओ आणि बीएलओ सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे शाळ
शाळांतील शैक्षणिक कार्य गंभीरपणे बाधित जिल्हा मुख्याध्यापक संघाची जिल्हा कचेरीवर धडक


अमरावती, 25 जुलै (हिं.स.)।

जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनःरीक्षण कार्यात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळांमधील ७० ते ८० टक्के शिक्षकांची बीएलओ आणि बीएलओ सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांमधील शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणात बाधित झाले असून शाळेत जो शिक्षकवर्ग शिल्लक आहे त्यांच्यापुढे शाळेतील विद्यार्थ्यांना सांभाळावे कसे हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामळे जिल्हा मख्याध्यापक संघाने आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. गेल्या १ जुलैपासून जिल्ह्यात एसआयआर कार्य सुरू झाले आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने या कार्यात शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंशासित अशा सर्व शाळांतील शिक्षकांना नियुक्त केले आहे. १ जुलै ते ८ ॲागस्ट असा एसआयआरचा कालबद्ध कार्यक्रम असल्याने शाळा सकाळच्या सत्रात पूर्णवेळ घ्याव्यात व शैक्षणिक कार्य कोणत्याही स्थितीत पूर्ण करावे आणि शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी दिवसभर एसआयआरचे कार्य करावे, असे आदेश आहेत. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी ११.३० पर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे तसेच इतर शैक्षणिक कार्य करून त्यानंतर एसआयआरचे कार्य करणे सुरू केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने एसआयआर कार्यात तैनात शिक्षक, कर्मचाऱ्यांना तुमची आस्थापना कुठे आहे हे विसरा व पूर्णवेळ एसआयआर कार्य करा, दिलेल्या मुदतीत कार्य पूर्ण न झाल्यास निलंबनासोबत फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे कडक शब्दात सुनावल्याने हबकलेल्या शिक्षकांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा कार्यातून ३० जुलैपर्यंत पूर्ण सुटका करा व आम्हाला एसआयआरचे कार्य करू द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व शाळांचे मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत. दरम्यान, जिल्हा मुख्याध्यापक संघाने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या समस्येवर आता आपणच उपाय सांगावा अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे, सचिव प्रदीप नानोटे यांच्यासह मुख्याध्यापक संघातर्फे धनंजय पाठक, संदीप रक्षित, शहारे सर, रवींद्र हगवणे, प्रिया कडू, सुषमा मालवे, श्री. गाजी, श्रीमती इसरत, मंजू अडवाणी, श्री. देशमुख, श्री. घाटे, श्री. गादे, प्रवीण घोंगडे तसेच अमरावती महानगरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande