
परभणी, 25 जुलै (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत आटल्यामुळे नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले असून, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी 23 जुलै रोजी जिंतूर तहसीलदार यांना नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्यामार्फत निवेदन सादर करून तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. वारंवार सरपंच व ग्रामसेविकेकडे तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. पाचेगावचा समावेश जलजीवन मिशनमध्ये असूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिंतूर-औंढा मार्गावरील पाचेगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर छत्रपती ससे, आनंद डोंगरे, कैलास गोडसे, गणेशराव ससे, कुंडलिक ससे, गोविंद ससे, कानिफनाथ तळेकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या असून, निवेदनाची प्रत तहसील कार्यालय, जिंतूर तसेच जिंतूर पोलीस ठाण्यास देण्यात आली आहे. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis