
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। महात्मा गांधी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक अशोक कराड यांनी अहमदपूर ते पंढरपूर असा दीर्घ सायकल प्रवास करत आपली वारी अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पंढरपूर येथील प्रसिद्ध सायकल रिंगण सोहळ्यातही उत्साहात सहभाग नोंदवत एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल जयहिंद क्रीडा मंडळ, अहमदपूरच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अहमदपूर ते पंढरपूर हे खडतर अंतर सायकलने पार पाडत प्रा. कराड यांनी शारीरिक क्षमता, जिद्द आणि दृढनिश्चयाचा उत्तम परिचय दिला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार करण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि नियमित सायकल चालवल्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे समाजापर्यंत पोहोचव ण्याचा मोलाचा संदेश दिला. पंढरपुरात पार पडलेल्या पारंपरिक रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर आयोजित 'सायकल रिंगण सोहळ्यात' त्यांनी सहभाग घेत या वारीचा आनंद द्विगुणित केला.
प्राध्यापकीय पेशात सक्रिय असतानाही त्यांनी जोपासलेली ही जोपासना आणि फिटनेसची आवड महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण पिढीला निरोगी राहण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरत आहे. त्यांच्या या यशस्वी सायकल वारीबद्दल आणि भक्तीमय प्रवासाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून, विठू माऊलींची कृपा त्यांच्यावर सदैव राहो, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी शहरातील प्रसिद्ध डॉ. सुनील चलवदे, पत्रकार अनिल चवळे , प्रशांत माने तसेच लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे खेळाडू आणि अन्यमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis