
परभणी, 25 जुलै, (हिं.स.)। विश्व हिंदू परिषद, परभणीच्या वतीने गेल्या ४८ वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणारी पारंपरिक गोपाळ दिंडी यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. दिंडीत शहरातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्ती, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलसह वसंतराव नाईक विद्यालय, अरविंदो अक्षर ज्योती विद्यालय, खंडोबा बाजार विद्यालय, जनकल्याण विद्यामंदिर, उद्देश्वर विद्यालय आणि शहरातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. अरविंदो अक्षर ज्योती विद्यालयाच्या लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण केले, तर वारकरी वेशातील बालगोपाळ आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले. एनव्हीएस प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी साकारलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबाचा देखावा विशेष आकर्षण ठरला. यंदाच्या दिंडीच्या पूजेचा मान माळी गल्ली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजू सुरवसे व सौ. स्मिताताई सुरवसे दाम्पत्यांना मिळाला. दिंडीदरम्यान विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, मित्र मंडळे, लॉयन्स क्लब तसेच महानगरपालिकेच्या सहकार्याने बालगोपाळांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. डॉ. केदार खटिंग यांच्या वतीने केळी प्रसाद, भगवान भोजवाणी यांच्या वतीने चॉकलेट, तर विविध संस्थांकडून फराळ व प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष अनिलराव अष्टुरकर, सचिव संतोषराव धारासुरकर, विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र क्षेत्र सहमंत्री तथा मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत लक्ष्मीकांत पांडे, व्यंकटेश तोरंबेकर, बाळकृष्ण कापरे, स्मिताताई ढगे, अय्यर मॅडम, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, शहराध्यक्ष अशोकराव राका, जिल्हामंत्री राजकुमार भामरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. माळी गल्ली येथून प्रारंभ झालेली ही भव्य गोपाळ दिंडी विद्यानगर जनकल्याण पतसंस्था परिसरात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह अभिजित अष्टुरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिंडीत सहभाग घेतला. यावेळी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र क्षेत्र सहमंत्री तथा मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी सांगितले की, गेल्या ४८ वर्षांपासून सुरू असलेली गोपाळ दिंडी ही केवळ मिरवणूक नसून बालसंस्कारांची चालती-बोलती शाळा आहे. वारकरी संप्रदायातील भक्ती, शिस्त, समता, सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी संतांच्या विचारांचे अनुकरण करून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. भक्ती, संस्कार, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही गोपाळ दिंडी परभणीच्या सांस्कृतिक परंपरेतील प्रेरणादायी उपक्रम म्हणून यंदाही उत्साहात संपन्न झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis