
सातारा, 25 जुलै, (हिं.स.)। दरवर्षी देवशयनी एकादशी अर्थात आषाढ शुद्ध एकादशीला हिंदू धर्माचा चातुर्मास मोठ्या उत्साहात प्रारंभ होतो .आज आषाढ शुद्ध एकादशीला या चार्तुमास कार्यक्रमाला विविध धार्मिक उपक्रमांनी सुरुवात झाली. त्यातच आषाढ शुद्ध एकादशीला वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून अनेक वैष्णव भक्त हे उपवासाचे व्रत करतात. सातारा जिल्ह्यातही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील श्री गवई विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. या मंदिराला एकादशी निमित्त केलेली विद्युत रोषणाई विशेष लक्ष वेधून घेत होती .
पहाटे मंदिराचे विश्वस्त आणि मालकगवई यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची षोडशोपचार महापूजा करण्यात आली .आकर्षक फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्यामध्ये त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला अलंकार युक्त पोशाख घालण्यात आले. महाआरती केल्यानंतर दर्शनासाठी दिवसभर सातारकरांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या दुपारी व्यंकटपुरा पेठ महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .गवई विठ्ठल मंदिरात सायंकाळी भक्ती धारा हा भक्ती संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शहरातील राजवाडा परिसरात अनेक व्यापारी बंधूंनी वैष्णव भक्तांसाठी उपवासाच्या खिचडीचा प्रसाद मोफत स्वरूपात मोठ्या प्रमाणात वितरित केला.
शहरातील यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिरांजीच्या घाटगे विठ्ठल मंदिरात आज सकाळी विठ्ठलाची महापूजा करून विठ्ठलाला आकर्षक पगडी घालून फुलांची आरास करण्यात आली होती .दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
आषाढी एकादशी निमित्त राजवाडा परिसरातील श्री पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेची श्री विठ्ठल रूपातील बांधण्यात आलेली पूजा विशेष लक्षवेधक ठरत होती या कमरेवर हात ठेवलेल्या विठ्ठल रुपी दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत मंदिरात गर्दी केली होती सातारा शहरा नजीकच्या संगम माहुली येथील राही - रुक्मिणी विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .खणआळी परिसरातील संत नामदेव मंदिर सोमवार पेठेतील संत ज्ञानेश्वर मंदिर ,यादोगोपाळ पेठेतील श्री दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात ही विशेष पूजा करण्यात आली होती. तसेच फुलांचे हार आणि मंदिर सुशोभित करण्यात आले होते. सातारा शहरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरातही विशेष पूजा तसेच प्रसादाचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड मोठ्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. करहर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. आ. शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, तहसीलदार हणमंत कोळेकर, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दर्शणार्थींनी देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंदिर व्यवस्थापनाचे वतीने सर्व भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला रात्री उशिरापर्यंत विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हरिजागर तसेच मंत्रजागर करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये उपवासाची खिचडीचे पदार्थ तसेच राजगिरा लाडू प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले होते. मंदिराबाहेर तुळशी, बुक्का, विविध सुवासिक फुले यांच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते सातारा शहरातील अनेक मिठाई विक्रेत्यांकडे एकादशीच्या उपवासासाठी लागणारे फराळाचे पदार्थ खरेदीसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
समर्थ सेवा मंडळ सज्जनगड च्या वतीने आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यान चातुर्मास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ ही सायंकाळी समर्थ सदन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला .
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर