
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी, २७ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या तारखेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. आता हे शिबीर मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी पार्वती मंगल कार्यालय, बसवेश्वर चौकाच्या पुढे, कातपूर रोड, लातूर येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा एक खिडकी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यामध्ये सातबारा व फेरफार दुरुस्ती, डिजिटल सातबारा सेवा, विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे वितरण, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, फार्मर आयडी, महिलांचे नाव अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे आणि पात्र निवासी अतिक्रमाणाचे नियमितीकरण यांसारख्या कामांचा समावेश आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, राजमाता जिजाऊ महिला सक्षमकरण योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आणि शिधापत्रिका वितरणासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ व मार्गदर्शन नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबिरात मोफत सर्वसमावेशक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत डोळ्यांची तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, महिलांचे आरोग्य, हाडांचे आजार, कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी, रक्त तपासणी व आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 'हरितोत्सव' आयोजित करून नागरिकांना विविध प्रकारच्या फळझाडांची व इतर उपयुक्त वृक्षांची रोपे वितरीत केली जातील आणि वृक्षलागवडीबाबत जनजागृती केली जाईल. तसेच महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ येथे उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर तत्परतेने कारवाई करणार असल्याने, लातूर शहर मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मंगळवारी, २८ जुलै २०२६ रोजी पार्वती मंगल कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis