रासायनिक शेतीने रानभाज्यांचे अस्तित्व धोक्यात
जैवविविधतेवरही संकट, नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा अमरावती, 25 जुलै (हिं.स.) पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील शेतशिवार, बांध आणि जंगल परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक रानभाज्या आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहेत. रासायनिक खतांचा वाढता वापर, तणनाश
रासायनिक शेतीने रानभाज्यांचे अस्तित्व धोक्यात


जैवविविधतेवरही संकट, नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा

अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील शेतशिवार, बांध आणि जंगल परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक रानभाज्या आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहेत. रासायनिक खतांचा वाढता वापर, तणनाशकांच्या अतिरेकी फवारण्या, जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास, यामुळे पारंपरिक रानभाज्यांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले असून, जैवविविधतेसह ग्रामीण खाद्यसंस्कृतीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. चांदूरबाजार तालुक्यासह पूर्व विदर्भातील जंगल व ग्रामीण भागात पूर्वी अतफरी, तरोटा, शिरडिरे, कुड्याची फुले व शेंगा, डुंबर, अनरसात्या (मशरूम) आणि कर्टूले यांसारख्या अनेक रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळत असत. लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, तंतुमय घटक (फायबर) आणि इतर सूक्ष्म पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्याने या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. विशेषतः पावसाळ्यात त्यांचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पूर्वी जून महिन्यापासून दसरा-दिवाळीपर्यंत स्थानिक बाजारपेठांमध्ये या रानभाज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असे. शहरातील ग्राहकांकडूनही त्यांना चांगली मागणी असल्याने अनेक ग्रामीण कुटुंबांना हंगामी रोजगार व अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत होते. मात्र, आता बाजारात या भाज्या क्वचितच दिसत असून त्यांचे प्रमाण वर्षागणिक घटत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, रासायनिक खतांचा संतुलित वापर, तणनाशकांचा मर्यादित वापर, नैसर्गिक शेतीचा अवलंब आणि जैवविविधतेचे संवर्धन केल्यास रानभाज्यांचे अस्तित्व टिकवून ठेवता येऊ शकते. शाश्वत शेती पद्धतीचा स्वीकार करून नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

रानभाज्या या केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा भाग नसून ग्रामीण आरोग्य आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा ठेवा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील पिढीला या रानभाज्यांची माहिती केवळ पुस्तकांमधूनच मिळेल. -डॉ. आशिष अग्रवाल

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande