
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)।
शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान संपन्न
* ३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
* शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल नागरिकांसाठी आकर्षण
सर्वसामान्य नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये,त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत व्हावी,यासाठी महसूल प्रशासनाने समाधान शिबिराचे आयोजन केले आहे.शिबिरात ज्या तत्परतेने कामे होत आहेत,त्याचप्रमाणे पुढील काळातही नागरिकांची कामे कार्यालयातून वेळेत झाली पाहिजेत,असे प्रतिपादन कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी केले.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ओमसाई मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती श्री.कोकणे,कळंब पंचायत समिती सभापती राजश्री वरपे,धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम,उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे,जिल्हा परिषद सदस्या कांचन संगवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ.पाटील म्हणाले की,समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाऊन सेवा दिली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जनतेसाठी काम करणे आवश्यक आहे.अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू असून,नागरिकांना छोट्या- छोट्या कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये. प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करावी,विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे,असेही त्यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या,ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या मुळापासून सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून,यंत्रणांनी प्रभावी काम केल्यास त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचतो.
कळंब पंचायत समितीच्या सभापती राजश्री वरपे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा,असे आवाहन केले.
जिल्हा परिषद सदस्या कांचन संगवे म्हणाल्या की,अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे.महाआरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच रेशनकार्डासंदर्भातील समस्या तहसील कार्यालयात सोडवून घ्याव्यात.
३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून एकूण ३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
महसूल विभागाच्या तहसील कार्यालय, कळंबमार्फत श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनेचे ३६०,ईजीएस केवायसीचे ११५ आणि शैक्षणिक दाखल्यांचे ४७१ वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे ५३६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत ६५ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.नगर परिषद, कळंबमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६ तर दीनदयाळ जनआजीविका योजना (शहरी) अंतर्गत २ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
पंचायत समिती कळंबमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचे ४५, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकाम व वापर प्रोत्साहन निधीचे १२ लाभार्थी,तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लखपती दीदी प्रमाणपत्रांचे ३७ वितरण आणि महिला स्वयंसहाय्यता गटांना सामुदायिक गुंतवणुकीचे ४ लाभ देण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे ५४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना (२०), बालसंगोपन योजना (१२०), आधार कार्ड संलग्न सेवा (३०), एकल महिला योजना (१७), दिव्यांग योजना (१५) आणि बेबी केअर किट (२७१) लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.भूमी अभिलेख विभागामार्फत सनद फीची ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
गट शिक्षण कार्यालय,पंचायत समिती कळंब यांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी (४७८), समाजकल्याण शिष्यवृत्ती (६८), दिव्यांग विद्यार्थीनी प्रोत्साहन भत्ता (१३२), मदतनीस भत्ता (९१), प्रवास भत्ता (६८),लेखनिक/वाचनिक भत्ता (६),साहित्य साधने (२४), टीएलएम किट (१२), व्हीलचेअर (३),श्रवणयंत्र (६), क्रचेस (२), सीपी चेअर (१), लार्ज प्रिंट बुक (२२) आणि दिव्यांग प्रमाणपत्रे (१२५) देण्यात आली.
महावितरण उपविभागीय कार्यालयामार्फत SMART Scheme अंतर्गत २३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-म्हशींच्या गटांचे वाटप करण्यात आले.तहसील कार्यालय, धाराशिवमार्फत किसान विकास पत्रांचे २७, शिधापत्रिकांचे ५,शेळी गट वाटप ५,संजय गांधी/श्रावणबाळ योजनेचे ३३ लाभार्थी आणि शैक्षणिक दाखल्यांचे १० वितरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis