मेळघाटचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी
युवा स्वाभिमान पक्षाचे पालकमंत्र्यांना निवेदन अमरावती, 25 जुलै (हिं.स.)। मेळघाट व चिखलदरा परिसरातील स्थानिक जनतेच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी युवा स्वाभिमान पक्षाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सात प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर के
मेळघाटचे विविध प्रश्न सोडविण्यासाची मागणी


युवा स्वाभिमान पक्षाचे पालकमंत्र्यांना निवेदन

अमरावती, 25 जुलै (हिं.स.)।

मेळघाट व चिखलदरा परिसरातील स्थानिक जनतेच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी युवा स्वाभिमान पक्षाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सात प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मंजुरी द्यावी, अशी विनंती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

निवेदनात बागलिंगा पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करावी, चिखलदरा-आलाडोह (भीमकुंड) येथील फॉरेस्ट अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीचे शुल्क कमी करून त्याचे संचालन स्थानिक युवकांकडे सोपवावे, मेळघाटातील गवळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी आधुनिक दूध डेअरी प्रकल्प उभारावा, तसेच दूध व्यवसायिक व शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण ठेवून दर कमी करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय परतवाडा-चिखलदरा रस्ता चौपदरी करण्याची मागणी करण्यात आली असून, या मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने चिखलदरा येथील प्रस्तावित स्कायवॉकचे काम तातडीने पूर्ण करावे, जेणेकरून पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा युवा स्वाभिमान पक्षाचे उपेन बछले, प्रमोद शनवारे, राम हेकडे आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande