डायल 112 ही जीवनरक्षक आपत्कालीन सेवा; गैरवापर करणाऱ्या दोघांवर नेकनूर पोलिसांची कायदेशीर कारवाई
बीड, 25 जुलै (हिं.स.)। नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्या दोन जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडलेली नसताना वारंवार खोटे क
पोलीस कारवाई


बीड, 25 जुलै (हिं.स.)।

नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्या दोन जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडलेली नसताना वारंवार खोटे कॉल करून पोलीस प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याने, अशा प्रकारच्या गैरवापरास आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जुलै 2026 रोजी पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान संबंधित आरोपींनी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर सुमारे 10 वेळा विनाकारण कॉल करून खोटी माहिती दिली. या प्रकारामुळे आपत्कालीन सेवेचे कामकाज बाधित झाले. तसेच प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या नागरिकांना वेळेत मदत मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात एन.सी.आर. क्रमांक 517/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 212 व 3(5) अन्वये आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

चंद्रसेन दादू दराडे, रा. दरडवाडी, ता. जि. बीड.

विक्रम दादू दराडे, ता. दरडवाडी, ता. जि. बीड.

डायल 112 ही सेवा अपघात, महिलांवरील अत्याचार, गुन्हे, आग, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती तसेच इतर तातडीच्या घटनांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी या उद्देशाने कार्यरत आहे. या सेवेचा गैरवापर करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून, एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब लावणारा गंभीर प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नेकनूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 चा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा. खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नये. आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. डायल 112 – तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे; त्याचा वापर जबाबदारीने करा, असे आवाहन नेकनूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande