
गडचिरोली., 25 जुलै (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले असतानाच, माओवादी असल्याचा बनाव रचून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
काय आहे प्रकरण?
गत १२ जुलै २०२६ रोजी पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जिजावंडी टोला रस्त्यावरील गावाच्या दिशादर्शक फलकाजवळ अज्ञात व्यक्तींनी लाल रंगाचे कापडी बॅनर आणि पांढऱ्या रंगाची पत्रके (पोस्टर) लावली होती. या फलक व पत्रकांवर नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा मजकूर लिहिलेला होता.
गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ नंतर जिल्ह्यात एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही. अशा स्थितीत घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक तयार करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आवळल्या मुसक्या
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कौशल्याने तपास केला. या तपासात माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर लावणारे दोन्ही आरोपी निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेले आरोपी शिवा अनिल मिस्त्री (वय ४८ वर्ष, रा. तरुणनगर, ता. पाखांजुर, जि. कांकेर, छत्तीसगड ,रोहीत रंज्जीत मल्लीक (वय २५ वर्ष, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली)गडचिरोली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा आणि आवाहन
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये. माओवाद्यांच्या नावाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने समाजात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधितांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.— एम. रमेश (पोलीस अधीक्षक, गडचिरोली)
पोलीस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond