
अमरावती, 25 जुलै (हिं.स.)। ग्रामिण भागात हेल्मेटसक्तीनंतर आणि अमरावती शहरात सुद्धा २४ जुलैपासून आदेश लागू झाले आहेत. अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेपेक्षा दंडाच्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणात हेल्मेट खरेदी सुरू केल्याची चित्र शहरात दिसत आहे. पहिल्याच दिवशी ४५० पेक्षा जास्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळपासूनच आतमध्ये येणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत होती. अनेकांना त्यांच्या मोबाईलवर दंडात्मक कारवाईचे मेमो देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. शहरात प्रामुख्याने पंचवटीचौक, शेगावनाका, जिल्हा परिषद कन्याशाळा ते विद्याभारती महाविद्यालय, इर्वीन ते मालवीयचौक, बियाणीचौक, रवीनगर, राजापेठ ते बडनेरा मार्ग, गांधीचौक, मोर्शी रोडवरील वाहतूक पोलिस कार्यालय, अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना थांबवून मेमो देताना दिसले. त्यात काही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, मोलमजूरी करणारे, दूधवाटप करीत फिरणाऱ्यांना थांबवून हेल्मेट खरेदी करण्याचा सल्ला वाहतूक पोलिस देताना दिसले. त्यांच्यावर फारशी सक्ती दाखविण्यात आली नाही. तातडीने हेल्मेट खरेदी करणाऱ्यांमध्ये पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सकाळ पासून वाहतूक पोलीस रस्त्यांवर उतरले असून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहे.
चौकाचौकात हेल्मेटची दुकाने
रहदारीच्या रस्त्यांवर, फुटपाथ तसेच चौकांमध्ये हेल्मेटची दुकाने लागली आहेत. एक हजार ते पाचशे रुपयांपर्यंतचे हेल्मेट येते उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश हेल्मेटवर आयएसआय मार्कचे स्टीकर चिकटविलेले दिसतात. दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे अनेक जण खरच हेल्मेट आयएसआय मार्कचे आहे की डुप्लिकेट याची शहानिशा सुद्धा करताना दिसले नाहीत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी